भाग्यनगर पोलिस ठाणे हद्दीत ट्रिपल मर्डर प्रकरणातील दोन फरार आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांची मोठी कारवाई

नांदेड (प्रतिनिधी) भाग्यनगर पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या ट्रिपल मर्डर प्रकरणातील दोन फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरातील गंभीर गुन्ह्याच्या तपासाला मोठे यश मिळाले आहे.

सदर प्रकरणात गु.र.नं. 172/2026 अंतर्गत भा.न्या.सं. कलम 103(1), 109, 118(1), 189, 191(2)(3), 190 तसेच भा.ह.का. कलम 04/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा रिपोर्ट मिलिंद सोनकांबळे यांनी दिला होता. दि. 04 एप्रिल 2026 रोजी रात्री 1.10 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास कॅनल रोडवरील ई-स्क्वेअर परिसरात प्रफुल ऊर्फ अजितसिंग गजानन चव्हाण यांची चाकू व तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. जुन्या वैमनस्यातून हा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या गुन्ह्यातील काही आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती, मात्र शेख शाहरुख ऊर्फ कबुतर (वय 29) व शेख उबेद (वय 23) हे आरोपी फरार होते. पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी विशेष पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला होता.

दि. 20 एप्रिल 2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पोउपनि मिलिंद सोनकांबळे व त्यांच्या पथकाने कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्यांना भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात व्यापक कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी करण्यात आली. त्यामध्ये सराईत गुन्हेगारांवर कारवाई करत अनेकांना ताब्यात घेण्यात आले असून काहींवर नवीन गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस अधीक्षकांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!