
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरात अक्षय तृतीया निमित्त भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ब्राह्मण समाजाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. १९ एप्रिल रोजी घरोघरी प्रतिमा पूजन करण्यात आले, तर २० एप्रिल रोजी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ‘जय परशुराम’च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले.


शोभायात्रेची सुरुवात शहरातील मानाचे श्री सत्य गणपती मंदिर येथून करण्यात आली. पारंपरिक गणपती मार्गानुसार ही शोभायात्रा शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून फिरली. शेवटी भगवान परशुराम यांच्या आरतीने कार्यक्रमाचा समारोप झाला. समाजातील ज्येष्ठ नागरिक डॉ. परसरामजी तिवारी यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.


या सोहळ्यासाठी हदगाव शहरासह तामसा, मनाठा, भानेगाव, शिरड आदी गावांमधून समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला, पुरुष आणि लहान मुलांचा उत्साह विशेष उल्लेखनीय होता. भगवे ध्वज आणि पारंपरिक वेशभूषेमुळे शोभायात्रेला आकर्षक रूप प्राप्त झाले होते.



कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे तालुकाध्यक्ष राजू पांडे, महिला तालुकाध्यक्षा सौ. सौभाग्य भोरे व इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित सर्व समाज बांधव तसेच सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासनाचे महासंघाच्या वतीने आभार मानण्यात आले.


