
हदगाव,गौतम वाठोरे| परिस्थितीवर मात करण्याची जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनत असेल तर कोणतेही शिखर गाठता येते, याचे उत्तम उदाहरण हदगाव तालुक्यातील उंचेगाव (बु.) येथील जमदाडे बंधूंनी घालून दिले आहे. गंगाधर किशन जमदाडे यांचे पुत्र कपिल आणि नयन यांनी कोणत्याही खाजगी कोचिंगचा आधार न घेता स्व-अभ्यासाच्या जोरावर ‘स्थापत्य अभियंता’ होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


मोठे बंधू कपिल गंगाधर जमदाडे यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर सातत्याने अभ्यास करत स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले. त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर आजवर पाच विविध सरकारी पदांवर त्यांची निवड झाली आहे. सुरुवातीला त्यांनी महावितरणमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्य केले. त्यानंतर लातूर महानगरपालिकेत बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून निवड झाली.


पुढे नगररचना विभागात सहाय्यक रचनाकार तसेच जलसंधारण विभागात (देगलूर) जलसंधारण अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे, दिल्लीतील प्रदूषण नियंत्रण विभागात कनिष्ठ अभियंता म्हणूनही त्यांची निवड झाली होती. सध्या ते रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन नगरपरिषद येथे सहाय्यक नगर रचनाकार म्हणून कार्यरत आहेत.


धाकटे बंधू नयन गंगाधर जमदाडे यांनीही भावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत मेहनतीच्या जोरावर यश मिळवले. प्रारंभी त्यांची आसाम राज्यात स्थापत्य अभियंता म्हणून निवड झाली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडीत त्यांची चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगरपरिषद येथे स्थापत्य अभियंता म्हणून नियुक्ती झाली आहे.


दोन्ही बंधू फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणीचे अनुयायी असून, त्यांचे वडील गंगाधर जमदाडे हे शासकीय तंत्रनिकेतनमधून अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या आई-वडील, गुरुजन तसेच प्राध्यापक डॉ. एस. एस. डुमणे यांना दिले आहे. ग्रामीण भागातील या दोन तरुणांच्या यशामुळे उंचेगावसह संपूर्ण हदगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
