
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात जागतिक वारसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


यंदाच्या “आपत्ती व संघर्षाच्या परिस्थितीत जिवंत वारशासाठी आपत्कालीन प्रतिसाद” या जागतिक थीमनुसार विभागीय रेल्वे कार्यालय संकुल (DOC) येथील उद्यानात असलेल्या स्टीम क्रेन स्थळी कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच भारतीय रेल्वेच्या ऐतिहासिक वारसा वस्तूंचे विशेष प्रदर्शनही यावेळी भरविण्यात आले.


या प्रदर्शनात DRM कार्यालय परिसरात जतन केलेला 35 टन क्षमतेचा स्टीम क्रेन, ZDM-4A डिझेल लोकोमोटिव्ह तसेच छत्रपती संभाजीनगर स्थानकावर संरक्षित ऐतिहासिक YP स्टीम लोकोमोटिव्ह (1965) यांचा समावेश होता.



या वारसा घटकांमधून भारतीय रेल्वेचा समृद्ध इतिहास आणि तांत्रिक प्रगती अधोरेखित होते. विशेषतः आपत्ती व संकटाच्या काळात अशा वारशाचे संरक्षण किती आवश्यक आहे, यावर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला.

नांदेड विभाग रेल्वे वारसा जतन व प्रसारासाठी कटिबद्ध असून, कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये वारसा संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
