भरधाव हायवांमुळे वाढता धोका; अपघातांच्या मालिकेनंतर संताप व्यक्त

नांदेड| शहरात भरधाव धावणाऱ्या हायवा वाहनांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून निष्पाप नागरिकांचे जीव जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

काल लातूर फाटा येथे पाच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर परवा एका शाळकरी मुलाला अल्पवयीन चालकाने चिरडल्याची घटना घडली. यापूर्वी ढवळे कॉर्नर येथे एका कीर्तनकार महाराजांचा अपघातात मृत्यू झाला होता. तसेच आज भरधाव हायवाने वीजेचा पोल, तारा आणि साईबाबा कमान पाडल्याची घटना घडली.

या घटनांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक डॉ. अभिषेक सौदे यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला कठोर कारवाईची मागणी केली आहे. वारंवार सूचना देऊनही हायवा चालक व मालक नियम पाळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

शहरातील कौठा, वसरणी, असर्जन, सिडको, हडको आणि असदवन या भागात सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत हायवा वाहतूक पूर्णतः बंद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा जनतेला रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

ठेकेदारांनी आपल्या चालकांवर नियंत्रण ठेवावे, तसेच प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी मागणी पुढे येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!