
नांदेड| अवैध वाळू उत्खननाविरोधात महसूल प्रशासनाने सोमवारी पहाटे मोठी कारवाई करत मौजे भनगी येथे नदीपात्रात धाड टाकली. या कारवाईत अवैधरित्या वाळू उपसा करणारे तीन इंजिन आणि एक बोट जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट घडवून नष्ट करण्यात आली. जप्त व नष्ट करण्यात आलेल्या साहित्याची अंदाजे किंमत सुमारे 13 लाख रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.


ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वात पार पडली. नदीपात्राचे होणारे नुकसान, पर्यावरणीय हानी तसेच शासनाच्या महसुलाला बसणारा फटका लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर पावले उचलली.


कारवाईत नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, मंडळ अधिकारी श्रीकृष्ण येलमाटे, कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, शिवानंद स्वामी, सय्यद मोसीन तसेच ग्राम महसूल अधिकारी मनोज सारपे, मनोज जाधव, गजानन होळगे, रमेश गिरी, राजेश बरोडा, महेश जोशी, गोपीनाथ कल्याणकर, पोलीस कर्मचारी नागरगोजे आणि महसूल सेवक बालाजी सोनटक्के यांनी सहभाग घेतला.



या कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील काळातही अशा बेकायदेशीर प्रकारांविरोधात सातत्याने कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा महसूल विभागाने दिला आहे.


