
नांदेड | महापुरुषांच्या जयंती सोहळ्यांचे आयोजन करताना पोलीस प्रशासनाबरोबरच जनतेचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असते, आणि हे सहकार्य सिडको भागातील भीमजयंती मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मिळाले, असे प्रतिपादन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी केले.


सिडको परिसरात भीमजयंती सोहळा शांततेत व उत्साहात पार पडल्याबद्दल दि. १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता पंचशील बुद्ध विहार, हडको येथे पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.


कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात सुनील वडगावकर यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडत पोलीस प्रशासनाच्या सहकार्याबद्दल माहिती दिली.


यावेळी पो.नि. चिंचोलकर म्हणाले की, “पोलीस विभाग हा जनतेसाठीच आहे. सर्वांच्या सहकार्याने कोणतेही कार्य यशस्वी होते. भीमजयंती मंडळांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत.”


या कार्यक्रमास नगरसेवक प्रतिनिधी राजू लांडगे, अक्षय बनसोडे, दिगंबर शिंदे, प्रीतम जोंधळे, डी. के. कांबळे, विलास गजभारे, आयोजक सुनील वडगावकर तसेच पंचशील बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष लोहकरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनील वडगावकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमजयंती सोहळा समिती, सिडको यांनी पुढाकार घेतला.
