
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून कामारी येथे आज भव्य मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


शिबिरात ५००हून अधिक रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले, तर सुमारे २०० रुग्णांना पुढील तपासणी व शस्त्रक्रियेसाठी वर्धा येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.



वर्धा येथे जाण्यासाठी मोफत बस सेवा, राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था, सर्व तपासण्या व उपचार विनामूल्य, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. कार्यक्रमास आमदारांचे चिरंजीव शिवराज पाटील यांच्यासह दोन्ही तालुक्यांतील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले असून, सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प यामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.


