
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व तालुक्यात रविवारी रात्री अचानक आलेल्या जोरदार वादळी वारे व पावसामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांतील घरांवरील टिनपत्रे उडून गेली असून, काही ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झाले आहे.


विशेषतः हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव (पश्चिम) परिसरात वादळाचा फटका अधिक बसला. गावातील अनेक कुटुंबांचे निवारे उद्ध्वस्त झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.


वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. यात हळद, उन्हाळी ज्वारी, संत्रा, मोसंबी, आंबा,चिकू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.


मुक्या जनवारांसाठी जमून ठेवलेल वैरण देखील वादळी वाऱ्याने उडून गेल्यानं मोठं नुकसान झालं आहे. ग्रामीण भागातील अनेक घरांवरील टिन पत्रे उडून गेल्याने कुटुंबे उघड्यावर आली आहेत. काही ठिकाणी भिंती कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.



स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच बाधित कुटुंबांना तातडीने मदत देण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. वादळामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही दिवस हवामानावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने वतीने करण्यात आले आहे.
एकूणच अचानक आलेल्या “जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर वीज तारा तुटल्याने ग्रामीण भाग अंधारात बुडाला. नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागली असून, खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.”
