
नांदेड | नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर कारवाईचा धडाका कायम ठेवत, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने अर्धापूर येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली.


दि. १८ एप्रिल रोजी अर्धापूर येथील उमर कॉलनी परिसरातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच अनेक जुगारी पळून गेले, मात्र ४ आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले.


आरोपीकडून ₹10,300 रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, १२ मोटारसायकली असा एकूण ₹6,60,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 207/2026 अंतर्गत महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


या धाडीत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. या कारवाईबद्दल पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे. अवैध व्यवसायां विरोधात माहिती देण्यासाठी ‘खबर’ हेल्पलाइन (9150100100) सुरू असून नागरिकांनी फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


