
नांदेड (प्रतिनिधी) शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी प्रभावी आधार ठरत असून, नांदेड जिल्ह्यात आर्थिक वर्षात १,०६७ रुग्णांना सुमारे ८ कोटी २१ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून या योजनेत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. जिल्हा कक्षांची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, अर्जांचा तातडीने निपटारा यामुळे मदत वितरण अधिक वेगवान व पारदर्शक झाले आहे. तसेच, सामंजस्य करार (MoU) आणि क्राउड फंडिंगच्या माध्यमातून विविध रुग्णालये, धर्मादाय संस्था व दाते यांचे सहकार्य मिळत आहे.


२० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य
या योजनेअंतर्गत कॉक्लियर इम्प्लांट (२ ते ६ वर्षे), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, नवजात शिशुंचे आजार, डायालिसिस, केमोथेरपी/रेडिएशन, भाजलेले रुग्ण, विद्युत अपघात आदी एकूण २० गंभीर आजारांसाठी मदत दिली जाते.


बालकांच्या कर्करोग उपचारासाठी करार
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत निधी उपलब्ध होऊन गरजू बालकांना कर्करोग उपचार अधिक सुलभ होणार आहेत.


राज्यभरातही मोठ्या प्रमाणात मदत – १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील ४०,७७६ रुग्णांना ३३३ कोटी रुपयांहून अधिक मदत देण्यात आली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्याचा लक्षणीय वाटा आहे.
हेल्पलाईनवर संपर्क साधा – गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे. एकूणच, सुधारित कार्यपद्धतीमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना ही गरजू रुग्णांसाठी जीवनदायी आधार ठरत आहे.
