‘सखी’ वन स्टॉप सेंटरमुळे नांदेडमध्ये १,१७५ महिलांना आधार; संकटात ठरते विश्वासाचे ठिकाण

नांदेड(प्रतिनिधी) घरगुती हिंसाचारापासून सामाजिक अन्यायापर्यंत विविध संकटांना सामोरे जाणाऱ्या महिलांसाठी नांदेड येथील ‘सखी’ वन स्टॉप सेंटर हे केंद्र खऱ्या अर्थाने आधारवड ठरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत १ हजार १७५ महिलांना मदत मिळाली असून, शेकडो महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यात यश आले आहे.

महिलांना अनेकदा घराच्या चार भिंतीत किंवा सार्वजनिक ठिकाणी अन्याय सहन करावा लागतो. अशा वेळी तक्रार कुठे करावी, मदत कुठून मिळवावी हा प्रश्न उभा राहतो. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘वन स्टॉप सेंटर’ अर्थात ‘सखी केंद्र’ ही संकल्पना सुरू केली. नांदेडमध्ये १७ जून २०१७ रोजी या केंद्राची स्थापना झाली असून, अल्पावधीतच हे केंद्र महिलांसाठी विश्वासाचे ठिकाण बनले आहे.

विविध सेवांमुळे महिलांना दिलासा

नांदेड सखी केंद्रात आतापर्यंत आलेल्या १,१७५ प्रकरणांमध्ये सर्व महिलांचे समुपदेशन करण्यात आले आहे. यापैकी १०३ महिलांना तात्पुरता निवारा, ६८५ महिलांना कायदेशीर मदत, ३३ महिलांना पोलीस सहाय्य, तर ७२ महिलांना वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. तसेच, महिला हेल्पलाईन १८१ वरून प्राप्त झालेल्या १४७ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला आहे.

केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे पीडित महिलेला विविध सेवांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज भासत नाही. वैद्यकीय सेवा, पोलीस मदत, कायदेशीर सल्ला, मानसिक समुपदेशन आणि तात्पुरता निवारा या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येतात. आतापर्यंत केंद्रामार्फत १,९३३ सेवा पुरविण्यात आल्या आहेत.

कोणत्याही संकटात मिळते मदत

घरगुती हिंसाचार, हुंडाबळी, लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ला, मानवी तस्करी तसेच बाल लैंगिक अत्याचार (POCSO) अशा गंभीर प्रकरणांमध्ये सखी केंद्रामार्फत महिलांना तातडीने मदत दिली जाते.

कायद्याचे भक्कम पाठबळ

या केंद्राचे कार्य ‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५’ अंतर्गत चालते. या कायद्यांतर्गत महिलांना संरक्षण आदेश, निवासाचा हक्क, आर्थिक सहाय्य आणि मुलांच्या ताब्यासाठी आवश्यक कायदेशीर मार्गदर्शन दिले जाते.

२४ तास हेल्पलाईन सेवा

संकटात सापडलेल्या महिलांसाठी १८१ हेल्पलाईन २४ तास कार्यरत आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास किंवा केंद्राला प्रत्यक्ष भेट दिल्यास महिलांना तातडीने मदत आणि संरक्षण मिळते. महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेले हे केंद्र नांदेडमधील महिलांसाठी केवळ मदतीचे ठिकाण नसून, त्यांच्या आत्मसन्मानाचे आणि सुरक्षिततेचे हक्काचे व्यासपीठ ठरत आहे.  – संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!