20 ते 22 एप्रिलदरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

मुंबई (प्रतिनिधी) राज्यात पुढील काही दिवस हवामानात बदल होण्याची शक्यता असून, 20 ते 22 एप्रिल दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, जोराचे वारे तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी पावसाचा प्रभाव वाढणार असून, पुणे विभागासह पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर विभाग) आणि विदर्भातील अमरावती विभागातही काही ठिकाणी वादळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र, 22 एप्रिल रोजी पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, संभाव्य हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावीत. तसेच, वादळी वारे आणि गारपिटीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. शेतमाल, भाजीपाला व इतर उत्पादन मोकळ्यावर ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

एकूणच, राज्यात पुढील काही दिवस दुपारनंतर हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!