
नांदेड परिक्षेत्रात धडक मोहीम; आठवड्यात ७३ गुन्हे, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड | नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ व घातक शस्त्रांविरोधात पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत पहिल्याच आठवड्यात मोठे यश मिळाले आहे. दि. ११ ते १७ एप्रिल दरम्यान झालेल्या कारवाईत एकूण ७३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ₹५०.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. यामध्ये गुटखा प्रकरणे: १२ गुन्हे, अंमली पदार्थ प्रकरणे: १ गुन्हा, शस्त्र अधिनियमांतर्गत: ६० गुन्हे दाखल झाले असून, ₹30,60,611 किमतीचा गुटखा व अन्य साहित्य ₹1,12,550 किमतीचा गांजा ₹18,79,230 किमतीची शस्त्रे (३ गावठी पिस्टल, १० काडतुसे, तलवारी, खंजीर) अशी एकूण जप्ती: ₹50,52,391 करण्यात आली.



परभणी ग्रामीण भागात ₹13.58 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. अर्धापूर येथे बनावट जर्दा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. तसेच लातूर स्थानिक गुन्हे शाखेने ₹8.56 लाखांचा गुटखा जप्त केला.


ही मोहीम पुढील आठवड्यात अधिक व्यापकपणे राबविण्यात येणार असून, अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी पोलिसांनी ‘खबर’ हेल्पलाइन (9150100100) सुरू केली असून, नागरिकांनी फोन किंवा व्हॉट्स अॅपद्वारे माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


