
नांदेड| जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खननाविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत इज्जतगाव (ता. नायगाव) येथील गोदावरी नदीपात्रातून तब्बल ₹1 कोटी 70 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.


उपविभागीय पोलीस अधिकारी, बिलोली आणि कुंदूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात नदीपात्रात बोटीच्या सहाय्याने सुरू असलेला अवैध रेती उपसा उघडकीस आला.


कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 3 हायवा ट्रक (रेतीसह) 1 जेसीबी मशीन, 2 फायबर बोटी (मोठी व लहान), अंदाजे 8 ब्रास काळी रेती, असा एकूण सुमारे ₹1.70 कोटींचा मुद्देमाल जप्त केला. हलविणे शक्य नसल्याने फायबर बोटी जागीच नष्ट करण्यात आल्या. या प्रकरणी 9 जणांसह इतर काही इसमांविरुद्ध BNS कलम 303(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त वाहनांचे चालक, मालक तसेच यंत्रसामग्री धारकांवर कारवाई करण्यात आली आहे.



पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. या कारवाईनंतर पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल.” या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध वाळू व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


