
नांदेड| उन्हाळ्याच्या हंगामात वाढलेल्या प्रवासी गर्दीचा विचार करून दक्षिण मध्य रेल्वेने काकीनाडा टाउन–हिसार दरम्यान “Train on Demand (TOD)” विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे. ही गाडी मुदखेड–नांदेड–पूर्णा–बसमत–हिंगोली–वाशीम–अकोला मार्गे धावणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


गाडी क्रमांक 07717 काकीनाडा टाउन–हिसार TOD विशेष गाडी 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी 05.40 वाजता काकीनाडा टाउन येथून सुटेल. ही गाडी मुदखेड (22.15), नांदेड (23.10), पूर्णा (00.40), बसमत (01.10), हिंगोली (02.35), वाशिम (03.55), अकोला (05.45) मार्गे पुढे भुसावळ, वडोदरा, रतलाम व चित्तौडगड या प्रमुख स्थानकांवर थांबत गुरुवारी दुपारी 13.40 वाजता हिसार येथे पोहोचेल.


परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07718 हिसार–काकीनाडा टाउन TOD विशेष गाडी 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 14.10 वाजता हिसार येथून सुटून रविवारी 12.35 वाजता काकीनाडा टाउन येथे पोहोचेल.


या विशेष गाडीत एकूण 24 डबे असणार असून एसी फर्स्ट क्लास, एसी 2-टियर, एसी 3-टियर, स्लीपर क्लास, जनरल सेकंड क्लास तसेच एसएलआर डब्यांचा समावेश आहे. सुमारे 3500 किमी अंतर आणि जवळपास 96 तासांचा प्रवास असलेल्या या गाडीमुळे नियमित गाड्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी दक्षिण मध्य रेल्वे कटिबद्ध असून अशा विशेष गाड्यांच्या माध्यमातून अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


