गुन्हेगारीवर लगाम घाला; कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्याचे निर्देश – पालकमंत्री अतुल सावे

पालकमंत्री अतुल सावे यांनी कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने घेतला आढावा

नांदेड| जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस विभागासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आज पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी आश्विनी जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.  

पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यात अलीकडे घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने अधिक दक्षता घ्यावी, तसेच शांतता व सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अचानक धाडी टाकून गुन्हेगारीला आळा घालावा, कोम्बींग ऑपरेशन राबवून आरोपी शोधासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी तसेच जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी स्थानिक गुप्तवार्ता वाढविण्यावर भर द्यावा अशा सूचना दिल्या. शहर व जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर विशेष लक्ष ठेवावे, अवैध वाळू उत्खनन, गुटखा, मटका व अंमली पदार्थांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

तसेच पोलीस विभागाच्या अडचणी शासन स्तरावर सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत, सीसीटीव्ही प्रकल्प, पदभरती, पोलीस वसाहत व पोलीस आयुक्तालयाच्या प्रस्तावांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या सादरीकरणावर पालकमंत्री अतुल सावे यांनी नांदेड पोलीसांनी केलेल्या प्रतिबंधक कार्यवाहीची विशेषत:  MPDA अंतर्गत करण्यात आलेली कार्यवाही, गंभीर गुन्ह्यात झालेली घट, स्ट्रीट सेफ्टी पथक व रोजगार मेळावा उपक्रमाचे कौतूक केले.  

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड जिल्ह्याचा गुन्हे आढावा सादर करतांना नांदेड जिल्ह्यात प्रमुख गुन्हे जसे खून, दंगा, दरोडा जबरी चोरी, घरफोडी, चोरी, बलात्कार, विनयभंग, अपहरण  इत्यादी गुन्ह्यामध्ये सन 2024 तूलनेत सन 2025 मध्ये घट झाली आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या अवैध धंद्याविरुद्ध करण्यात आलेल्या कार्यवाहीमध्ये लक्षणीय वाढ असल्याचे सांगीतले. तसेच जानेवारी ते एप्रील 2025 च्या तूलनेत जानेवारी ते एप्रील 2026 या कालावधीतसुद्धा खून, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दुखापत, अपहरण, विनयभंग इत्यादी गुन्ह्यामध्ये सुद्धा घट आहे.  

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात पोलीसांकडून अभिलेखावरील गुन्हेगारांचे रेकॉर्ड तयार करुन दोन किंवा दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणारे सराईत गुन्हेगार यांची 2 + यादी तयार करुन त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येत आहे. MPDA कार्यवाहीमध्ये एकुण 37 आरोपींना एका वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करुन नांदेड जिल्हा सन 2025 मध्ये (आयुक्तालये वगळता) महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर असल्याचे त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व गुन्हेगारी कमी करण्याच्या दृष्टीकोणातून नेमण्यात आलेले स्ट्रीट सेफ्टी पथक, निर्भया पथक याबाबत सविस्तर माहिती दिली. पुढील काळातही जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

नांदेड पोलीसांनी चोरी झालेले व हरवलेले पैकी हस्तगत केलेले एकुण 303 मोबाईल किमती 46,03,000 रुपयाचे मुळ मोबाईलधारकाना पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस पोलीस अधीक्षक कार्यालय येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात वितरीत करण्यात आले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!