शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत 2026-27 प्रवेश प्रक्रिया जाहीर; प्रतिभावंत खेळाडूंना मोठी संधी

नांदेड| राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडविण्याच्या उद्देशाने शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनीत सन 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण, निवास, भोजन आणि आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर व गडचिरोली या ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, शूटिंग, फुटबॉल, जलतरण, ॲथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हँडबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, ट्रायथलॉन, सायकलिंग, बॉक्सिंग अशा १६ क्रीडा प्रकारांत प्रशिक्षण दिले जाते.

प्रवेश प्रक्रिया ५० टक्के सरळ प्रवेश आणि ५० टक्के खेळनिहाय कौशल्य चाचणी या पद्धतीने राबविण्यात येणार आहे. राज्यस्तरावर पदक विजेते किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले १९ वर्षांखालील खेळाडूंना सरळ प्रवेशाची संधी मिळणार आहे, तर इतर पात्र खेळाडूंना कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश दिला जाईल. निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करून अंतिम निवड निश्चित करण्यात येईल.

जिल्हास्तरावर इच्छुक खेळाडूंनी आपली नोंदणी २२ एप्रिल २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड येथे करणे आवश्यक आहे. तसेच गुगल लिंकद्वारे नोंदणी करण्याची अंतिम तारीख २३ एप्रिल २०२६ आहे. त्यानंतर विभागीय व राज्यस्तरावर विविध खेळांसाठी कौशल्य चाचण्या आयोजित करण्यात येणार आहेत.

राज्यस्तरीय चाचण्या मे महिन्यात विविध केंद्रांवर होणार असून, हँडबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, हॉकी आदी खेळांसाठी पुणे व नागपूर येथे चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ॲथलेटिक्स, शूटिंग आणि सायकलिंग या खेळांसाठी ‘खेलो इंडिया’ निपुणता केंद्रामार्फत थेट राज्यस्तरीय चाचणी होणार आहे.

या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह (क्रीडा प्रमाणपत्रे, आधारकार्ड, जन्म दाखला) उपस्थित राहणे बंधनकारक आहे. प्रवास, निवास व भोजनाची व्यवस्था खेळाडूंनी स्वतः करायची आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!