माहूरगड विकासाला वेग; भाविकांसाठी आधुनिक सुविधा उभारण्यावर भर – पालकमंत्री अतुल सावे

नांदेड| राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरगड येथे सुरू असलेल्या विकासकामांना गती देत भाविकांसाठी दर्जेदार व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. सर्व विभागांनी समन्वयातून नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माहूर येथे आयोजित आढावा बैठकीत आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपवनसंरक्षक मनीषा पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीतचंद्र दोन्तुला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

माहूर हे दररोज हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने येथे पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. भाविकांना सोयीस्कर, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून अडचणी तातडीने सोडविल्या जातील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी श्री रेणुका देवी मंदिर परिसर, मातृतीर्थ कुंड, पर्यटक सुविधा केंद्र, वाहनतळ आदी पहिल्या टप्प्यातील कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच दुसऱ्या टप्प्यात श्री दत्त मंदिर व शिखर परिसर, श्री अनुसया देवी मंदिर, कैलास टेकडी, श्री महादेव मंदिर, वनदेव मंदिर, कपिलेश्वर मंदिर, विविध दर्गे, बौद्ध विहार, जमदग्नी कृषी मंदिर, गणपती मंदिर परिसर, पोचमार्ग विकास, वन व पुरातत्त्व विभागाची कामे यांचा समावेश असून एकूण सुमारे ८२९.१३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यावर काम सुरू आहे.

आढावा बैठकीपूर्वी पालकमंत्री अतुल सावे यांनी श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले तसेच श्री दत्तशिखर संस्थानास भेट देऊन महंत धनेश्वर भारती (योगी श्याम भारती महाराज) यांची भेट घेतली. परमपूज्य मधुसुदनजी भारती महाराज यांच्या समाधीस्थळालाही त्यांनी अभिवादन केले.

दरम्यान, बैठकीत आदिवासी विभागाच्या विविध योजनांसह किनवट येथील रेल्वे उड्डाणपूल प्रस्ताव, वीजपुरवठा, कापूस जिनिंग युनिट विस्तार, प्राथमिक आरोग्य केंद्रांची प्रगती आणि गोदाम उभारणी आदी विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. एकूणच, माहूरगडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन सज्ज असून, भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!