
छत्रपती संभाजीनगर| छत्रपती संभाजीनगर विभागाचे नूतन विभागीय आयुक्त म्हणून जी. श्रीकांत यांनी आज पदभार स्वीकारला. माजी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.


पदभार स्वीकृतीवेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, प्रताप काळे, डॉ. अनंत गव्हाणे, दादासाहेब वानखेडे, सुषमा देसाई, मंजुषा मिसकर, सहआयुक्त राजेश काटकर, उपायुक्त सविता हरकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


नवीन आयुक्त श्रीकांत यांनी विभागप्रमुखांशी संवाद साधत मराठवाड्यातील शेती, टंचाईस्थिती, सामाजिक व प्रशासकीय विषयांची माहिती घेतली. “समन्वयातून विकास साधूया,” असे आवाहन करत त्यांनी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करण्यावर भर दिला.


छत्रपती संभाजीनगर विभाग हा सांस्कृतिक, ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असून पर्यटनास चालना देतानाच शिक्षण, आरोग्य आणि रोजगारनिर्मितीवर विशेष भर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. विभागाचा सर्वांगीण विकास साधून राज्यात अग्रस्थानी नेण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.


कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून ई-ऑफिस प्रणालीचा १०० टक्के अवलंब करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय कामकाजात अंतर्गत समन्वयाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

जी. श्रीकांत हे 2009 च्या यूपीएससी बॅचचे अधिकारी असून त्यांनी परभणी येथे परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केला आहे. किनवट येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून कारकीर्द सुरू करत त्यांनी नांदेड-वाघाळा महानगरपालिका आयुक्त, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला व लातूर जिल्हाधिकारी, तसेच जीएसटी सहआयुक्त अशा विविध पदांवर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
