
नांदेड| शहराला हादरवून टाकणाऱ्या देगलूर नाका परिसरातील चार शाळकरी मुलांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी महानगरपालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. कर्तव्यातील गंभीर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत दोन अभियंत्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, संबंधित कंत्राटदार व इतर जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


गुरुवारी (दि. १६ एप्रिल) इस्लामपुरा भागातील १० ते १३ वयोगटातील चार मुले एमजीआर गार्डन परिसरात खेळत असताना नाल्याच्या कामासाठी खोदलेल्या खोल खड्यात साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडली. या भीषण घटनेने संपूर्ण शहरात शोककळा पसरली होती.


या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी तातडीने चौकशी सुरू केली. प्राथमिक अहवालात निष्काळजीपणा स्पष्ट झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता शिवकन्या जायभाये आणि कनिष्ठ अभियंता किरण सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आले.


याशिवाय पर्यवेक्षणात त्रुटी आढळल्याने प्रभारी कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, उपअभियंता प्रकाश कांबळे व कनिष्ठ अभियंता जकीउल्ला खान यांना ‘निलंबित का करू नये?’ याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेस जबाबदार ठरलेल्या मे. गुरु रामदास कन्स्ट्रक्शन या कंत्राटदारासह प्रकल्प अभियंता, पर्यवेक्षक आणि संबंधित प्लॉटधारक मो. युसुफ मकरानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


महापालिका प्रशासनाने या घटनेचा सविस्तर अहवाल राज्याच्या नगर विकास विभाग व जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने नुकसानभरपाई देण्यास कंत्राटदाराला भाग पाडण्यात येणार असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व राजीव गांधी अपघात विमा योजनेतूनही मदत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री ना. अतुल सावे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “सार्वजनिक कामांमध्ये सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.” दरम्यान, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सर्व कामांमध्ये सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या हृदयद्रावक घटनेनंतर प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
