पाणी आवर्तन तात्काळ सुरू करा; शेतकरी संघर्ष समितीचा इशारा

नांदेड/हदगाव (प्रतिनिधी ) हदगांव तालुक्यातील तसेच हिमायतनगर परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांवर पाण्याअभावी संकट कोसळले असून, गुराढोरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हदगाव तहसीलदार तसेच उर्ध्व पैनगंगा पाटबंधारे विभाग क्र. ४ यांना निवेदन देत पाण्याचे आवर्तन तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ चार दिवस पाणी सोडून नंतर पुन्हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. “धरणात पाणी असूनही आमच्या शेतात येत नाही,” अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली.

यावेळी निवेदन देण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात गेल्यावर एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. “कार्यालयात अधिकारी कधी येतात, कधी जातात याचा पत्ता नाही. संपूर्ण कारभार ‘रामभरोसे’ सुरू आहे,” असा आरोप शेतकरी संघर्ष समितीने केला. या निष्काळजीपणामुळेच शेतकऱ्यांवर “धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी वेळ आल्याचे त्यांनी नमूद केले.

पाण्याचा पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे. या प्रसंगी आत्माराम पाटील वाटेगावकर, नागोराव सूर्यवंशी, संदीप पालकर, संदीप काळबांडे, पवन मोरे, अविनाश मोरे, माधवराव जाधव, सचिन मोरे आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!