
नांदेड| मुलींमध्ये होणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर आणि महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सुमती व्याहाळकर यांच्या पुढाकारातून हे शिबिर पार पडले.


शिवशक्तीनगर येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. रमेश माने यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रमेश नारलावार होते, तर शीतल खांडील यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमांतर्गत १४ ते १५ वर्षे वयोगटातील २७ मुलींना सुमारे ₹४५०० किंमतीची एचपीव्ही लस पूर्णपणे मोफत देण्यात आली.



भाजप नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्रेकरू संघ आणि मनपा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.संयोजक ॲड. दिलीप ठाकूर यांनी कर्करोग प्रतिबंधाबाबत जनजागृतीची गरज अधोरेखित केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत रिठे आणि डॉ. रितेशसिंह बिसेन यांनी एचपीव्ही लसीबाबत समाजातील गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले.



कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच लस घेतलेल्या मुलींना गुलाब पुष्प देऊन त्यांचे प्रोत्साहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेशसिंह ठाकूर यांनी केले, तर आभार नरसिंह कहाळेकर यांनी मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मनपा कर्मचारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.


