
नगरसेविका अनुपमा गायकवाड यांची कारवाईची मागणी
बिलोली| तालुक्यातील तसेच शहरातील स्वस्त धान्य दुकानांतून निकृष्ट दर्जाचा तांदूळ वितरित होत असल्याच्या तक्रारींना उधाण आले असून, यामुळे गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद बिलोलीच्या नगरसेविका सौ. अनुपमा महेंद्र गायकवाड यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.



नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मिळणारा तांदूळ तुटलेला, धुळकट असून काही ठिकाणी दगड-माती मिश्रित असल्याचे दिसून येते. तसेच काही वेळा तांदळाला दुर्गंधी येत असल्याने तो वापरण्यास अयोग्य ठरत आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.



स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या अन्नधान्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने निकृष्ट धान्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा अधिक धोका निर्माण होऊ शकतो.



या संदर्भात सौ. गायकवाड यांनी तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांची तात्काळ तपासणी करण्याची मागणी केली आहे. धान्य साठवण, वितरण प्रक्रिया आणि गुणवत्तेची पाहणी करून दोषी दुकानदारांवर कडक कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नियमित तपासणी यंत्रणा कार्यान्वित करावी, असे त्यांनी नमूद केले आहे.



नागरिकांना दर्जेदार तांदूळ व गहू वेळेत आणि योग्य प्रमाणात मिळावा यासाठी पुरवठा विभागाने विशेष लक्ष द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेविका अनुपमा गायकवाड यांनी दिला आहे.
