
नांदेड | तालुक्यातील खुरगाव (नांदुसा परिसर) येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात रविवार, १९ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा सोहळा पार पडणार असून निर्वाणपदस्थ भदंत जीनरत्न महाथेरो यांच्या स्मृतिप्रीत्यर्थही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


याबाबत माहिती देताना श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी सांगितले की, या प्रसंगी विपश्यनाचार्य भदंत पंय्यारत्न थेरो यांची धम्मदेसना होणार आहे. तसेच थायलंड धम्म सहलीवरून परतलेल्या बौद्ध उपासक-उपासिकांचा भव्य सत्कारही करण्यात येणार आहे.


कार्यक्रमात परित्राण पाठ, बोधीपूजा, त्रिरत्न वंदना, आनापान ध्यान, धम्मदेसना, बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम, तसेच भोजनदानाचा समावेश आहे. उपासिका वैशाली सावळे, गंगासागर जाधव आणि थायलंड धम्म सहलीतील सहभागी यांच्या वतीने उपस्थित भिक्खू संघ व बौद्ध बांधवांसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व बौद्ध उपासक-उपासिकांनी शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


