आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू; इस्लापूर हादरले

किनवट/इस्लापूर (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील श्री फुलाजी बाबा आश्रम शाळा येथे शिकणाऱ्या सातवीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव सुरेश अंकुश वाळके (वय १४, रा. सावरी) असे असून तो संबंधित आश्रम शाळेत सातवी इयत्तेत शिक्षण घेत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, वाढत्या तापमानामुळे शाळा सकाळच्या सत्रात घेऊन दुपारी सुट्टी देण्यात आली होती. शाळा सुटल्यानंतर काही विद्यार्थी कैऱ्या खाण्यासाठी जवळील शेतात गेले. यावेळी काही मुलांनी शेतातील विहिरीत पोहण्यासाठी प्रवेश केला. सुरेशला पोहता येत नसतानाही तो पाण्यात उतरला; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

सोबतच्या विद्यार्थ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरला. घटनेची माहिती मिळताच शिक्षकांनी तातडीने त्याला इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश सातोरे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. दरम्यान, इस्लापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी उमेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेनंतर नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळा प्रशासनाने अधिक जबाबदारीने वागण्याची गरज असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे इस्लापूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!