
हदगाव (गौतम वाठोरे) एकीकडे विकासाच्या घोषणा होत असताना, दुसरीकडे हदगाव तालुक्यातील शेतकरी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत असल्याचे चित्र समोर आले आहे. कर्जमुक्तीचा रखडलेला प्रश्न, पीक विम्यातील अडचणी आणि उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील सूर्यवंशी यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका करत “निवडणुकीपुरते दर्शन देणारे नेते जनतेच्या प्रश्नांकडे कधी लक्ष देणार?” असा सवाल उपस्थित केला आहे.


हवामान बदलामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला असताना शेतकऱ्यांना ना कर्जमुक्तीचा लाभ मिळतो आहे, ना वेळेवर पीक विमा. विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत असल्याची तक्रार आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) हदगाव शाखेत ‘KYC’ प्रक्रियेच्या नावाखाली ग्राहकांना तासन्तास थांबवले जात असल्याचा आरोप आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेत ग्राहकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.


हदगाव उपजिल्हा रुग्णालयात साध्या रक्त तपासणीसाठीही सुसज्ज प्रयोगशाळा नसल्याने रुग्णांना नांदेड किंवा हिमायतनगर येथे जावे लागत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तालुक्यातील ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष काम करण्याची वेळ आली असून लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


