रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब; हिमायतनगरमध्ये अपघाताचा धोका वाढला

महावितरण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
हिमायतनगर,अनिल मादसवार | शहरात प्रवेश करणाऱ्या श्री परमेश्वर मंदिराच्या मुख्य रस्त्यावर मधोमध तसेच दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या विद्युत खांबांमुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या गंभीर समस्येकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

माहितीनुसार, रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने विद्युत खांब न हटवता तसेच ठेवूनच काम पूर्ण केले. त्यामुळे सध्या रस्त्याच्या मधोमध व दोन्ही बाजूचे खांब रस्त्यात उभे राहिले असून, दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा करताना मोठा अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः मोठ्या वाहनांना वळण घेणे किंवा मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे.

या खांबांमुळे अनेक वेळा अपघात घडले असून काही वाहनधारकांना गंभीर दुखापती तसेच अपंगत्वही आले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. याबाबत वारंवार महावितरण विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी यापूर्वी या समस्येबाबत आमरण उपोषण केल्यानंतर खांब हटविण्याचा निर्णय महावितरण विभागाकडून घेण्यात आल्याचे लेखी दिले होते. मात्र, दीड महिना उलटूनही प्रत्यक्षात काम सुरू न झाल्याने महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित विभागाने तातडीने या धोकादायक खांबांचे स्थलांतर करावे, अन्यथा पुन्हा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!