नांदेडमध्ये गावठी पिस्टलसह तरुण अटकेत; 31 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एका तरुणाच्या ताब्यातून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस असा एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई इतवारा, नांदेड पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा क्रमांक 2026 अंतर्गत भा.ह.का. कलम 3/25, 7/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितम ऊर्फ बबलुलाला आनंद लोखंडे (वय 22, रा. संघसेन नगर, इतवारा) हा अवैधरीत्या गावठी पिस्टल विक्रीसाठी बाळगत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

त्यावरून पथकाने 15 एप्रिल 2026 रोजी संघसेन नगर परिसरात छापा टाकून संबंधित आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत एक लोखंडी गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला, जो पोलिसांनी जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत करण्यात आली. तसेच अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे व त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून, त्यांच्या कामगिरीचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.  आरोपीस मुद्देमालासह इतवारा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!