
नांदेड (प्रतिनिधी) मुलींमध्ये होणाऱ्या गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भारतीय जनता पक्ष, लायन्स क्लब, अमरनाथ यात्रेकरू संघ तसेच मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही लस देण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.


हे शिबिर शुक्रवार, दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत शिवशक्तीनगर, नांदेड येथे पार पडणार असल्याची माहिती धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली. या उपक्रमास खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे व चैतन्य देशमुख, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे तसेच लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होत आहे.


महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) संसर्ग प्रतिबंधक मोहीम ही मुलींमध्ये होणाऱ्या कर्करोगापासून संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून सुरू झालेल्या या मोहिमेचा उद्देश मुलींना लहान वयातच संरक्षण देणे हा आहे.


या मोहिमेत १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींना प्राधान्य देण्यात आले असून त्यांना गार्डासिल-४ ही लस मोफत दिली जाणार आहे. ही लस HPV चे प्रकार १६ आणि १८ पासून संरक्षण देते, जे सुमारे ७० टक्के गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरतात. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार ही लस सुरक्षित व प्रभावी आहे.


राज्यात सुमारे ९.८४ लाख मुलींना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ही मोहीम मिशन मोडमध्ये राबविण्यात येत आहे. यू-विन पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करून लसीकरणानंतर डिजिटल प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. तज्ज्ञांच्या मते, HPV हा प्रामुख्याने लैंगिक संपर्कातून पसरणारा विषाणू असल्याने लहान वयातच लसीकरण केल्यास त्याचा अधिक फायदा होतो.
“एक डोस – आयुष्यभराची सुरक्षा” हा संदेश लक्षात ठेवून पालकांनी कोणतीही भीती न बाळगता आपल्या मुलींना लसीकरणासाठी पुढे आणावे, असे आवाहन ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे. शिबिरास येताना मुलींनी आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.
