
नांदेड,गोविंद मुंडकर| सामाजिक प्रगतीच्या अनेक मापदंडांवर मराठवाड्याची ओळख ठळकपणे समोर येत नसली, तरी बालविवाहाच्या समस्येत हा प्रदेश देशात गंभीरपणे आघाडीवर असल्याची खंत शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक विचारवंत हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली. मराठवाडा साहित्य परिषद आणि आयआयबी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.


देशातील सुमारे ७० जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण लक्षणीय असल्याचे नमूद करताना त्यांनी सांगितले की, यातील १७ जिल्हे महाराष्ट्रातील असून, त्यापैकी तब्बल ८ जिल्हे मराठवाड्यातील आहेत. परभणी जिल्ह्यात दहा वर्षांपूर्वी ४८ टक्क्यांपर्यंत बालविवाह होत असल्याचे वास्तव त्यांनी मांडले.


मुलींच्या शिक्षणाबाबतची उदासीनता ही या समस्येची मुळ कारणे असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, ज्या महाराष्ट्राने मुलींच्या शिक्षणाची पहिली पायाभरणी केली, त्याच राज्यात आजही मुलींना शिक्षणापेक्षा लग्नाला प्राधान्य दिले जाते. “मुली पदवीधर झाल्याशिवाय त्यांचे विवाह करणार नाही,” असा निर्धार समाजाने केला, तरच या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.


महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, समाजपरिवर्तनासाठी त्यांच्या मूल्यांचा स्वीकार आणि आचरण अत्यावश्यक आहे. सव्वा तास चाललेल्या या व्याख्यानात त्यांनी फुले यांच्या कार्याचा प्रभावी आढावा घेत उपस्थितांना विचारप्रवृत्त केले.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला दशरथ पाटील यांनी कुलकर्णी यांचे स्वागत केले. यावेळी गुणवंतराव पाटील हंगरगेकर, देविदास फुलारी, गोविंद नांदडे, बालाजी कोम्पलवार, शिवदास हमंद, , व्यंकटेश चौधरी,आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे, प्रस्तावना, अध्यक्षीय भाषण व औपचारिक समारोपाशिवाय पार पडलेला हा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीचा ठरला.
