
नांदेड| संकुचित विचारसरणी व मर्यादित वर्तुळात राहणे हे लोकशाहीचे विकृतीकरण असून विचारांची आणि मनाची स्वातंत्रता हीच खरी लोकशाही आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे (Sudhir Gawhane) यांनी केले.


ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील (Swami Ramanand Teerth Marathwada University) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रातर्फे आयोजित महात्मा ज्योतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर (Mahatma Jyotirao Phule and Dr Babasaheb Ambedkar Jayanti Festival) समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.


डॉ. गव्हाणे म्हणाले, “आपले घर, आपली माणसे एवढ्यापुरता विचार मर्यादित ठेवणे हे देशासाठी घातक आहे. सर्व काही आपल्यालाच हवे हा स्वार्थीपणा असून तो दुबळेपणाचे लक्षण आहे.” लोकशाही टिकवायची असेल तर मन, विचार आणि कृती यांना स्वातंत्र्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


समाजातील संवाद कमी होत चालला असून बंधुभावाची भावना दुर्बल होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “सारे भारतीय माझे बांधव आहेत” या मूल्यांचा विसर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. अध्यासन केंद्राने संशोधनाला प्राधान्य द्यावे, विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही रिसर्च फेलोशिप उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र-कुलगुरू डॉ अशोक महाजन (Ashok Mahajan) यांनी आपल्या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर (B. R. Ambedkar) आणि महात्मा ज्योतिबा फुले (Jyotirao Phule) यांच्या विचारांचे आजही महत्त्व अधोरेखित केले. विज्ञान आणि एआयच्या युगातही या महापुरुषांचे विचार अंगीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डॉ. गव्हाणे यांनी मांडलेल्या अपेक्षा कुलगुरू डॉ मनोहर चासकर (Manohar Chaskar) यांच्याशी चर्चा करून पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
जयंती महोत्सवानिमित्त चित्रकला, रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र गोणारकर यांनी केले. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
