फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी

नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) प्रणाली लागू करण्यात येत आहे. यानुसार, फार्मर आयडी विना कोणत्याही शेतकऱ्याला खत मिळणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक राहील. आयडीशिवाय खत वितरण केले जाणार नाही. रासायनिक खतांवरील शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे. खतांचा काळाबाजार, साठेबाजी व अनावश्यक लिंकिंग रोखण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरणार असून वितरण प्रक्रिया पारदर्शक होणार आहे.

डिजिटल नोंदणी प्रणाली – या प्रणालीअंतर्गत शेतकऱ्यांची जमीन, पीक व योजनांची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवली जाईल. खत खरेदी करताना आयडी क्रमांक किंवा स्कॅनद्वारे नोंद होईल.

थेट लाभ हस्तांतरण (DBT) – खतावरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल. भविष्यात इतर शासकीय योजनांसाठीही फार्मर आयडी आवश्यक राहील.

नोंदणी कुठे करावी?
ग्रामपंचायत कार्यालय, CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर), सहाय्यक कृषी अधिकारी / कृषी विभाग कार्यालय, सध्या जिल्ह्यात फार्मर आयडी नोंदणी मोहिम सुरू असून, सर्व तालुक्यांत जनजागृती व नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या सूचना
शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी पूर्ण करावी,खत खरेदीवेळी फार्मर आयडी सोबत ठेवावा, अधिकृत विक्रेत्याकडूनच खत खरेदी करून बिल घ्यावे. खरीप हंगाम २०२६ पासून हा नियम काटेकोरपणे लागू करण्यात येणार असून सहकारी संस्था व खाजगी विक्रेत्यांमार्फतही याच नियमांनुसार खत वितरण होणार असल्याचेही दत्तकुमार कळसाईत यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!