
मुंबई| जपानी मेंदूज्वरासारख्या धोकादायक संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला असून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


मुख्यमंत्री म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करत या आजारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. २०१५-१६ दरम्यान देशातील इतर राज्यांत लसीकरण मोहीम सुरू असताना विदर्भातील काही जिल्ह्यांत जपानी मेंदूज्वराचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर राज्यातही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. या उपाययोजनांमुळे सध्या रुग्णसंख्या जवळपास शून्यावर आली आहे.


आजाराचे स्वरूप आणि धोका
जपानी मेंदूज्वर हा डासांद्वारे पसरणारा गंभीर आजार असून तो मेंदूवर परिणाम करतो. यात झटके येणे, न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होणे आणि मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा आजार विशेषतः लहान मुलांसाठी अधिक धोकादायक मानला जातो.


राज्यातील स्थिती – २०२१ ते मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील रुग्णसंख्या मर्यादित राहिली आहे.
- २०२२ : २ रुग्ण
- २०२३ : ५ रुग्ण
- २०२४ : ५ रुग्ण, २ मृत्यू
- २०२५ : ७ रुग्ण, १ मृत्यू
- मार्च २०२६ पर्यंत : एकही रुग्ण नाही
नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत प्रामुख्याने रुग्ण आढळले आहेत.


लसीकरण मोहिमेची प्रगती – एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान लसीकरणात मोठी प्रगती झाली आहे.
पहिला डोस : ८९.२६%, दुसरा डोस : ७८.६८% धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र रायगड, पुणे आणि पीसीएमसी भागात दुसऱ्या डोसचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
उपचार आणि सुविधा – राज्यात नागपूर, गडचिरोली, सेवाग्राम (वर्धा), भंडारा आणि गोंदिया येथे निदानासाठी सेंटीनेल केंद्रे कार्यरत आहेत. तसेच १६ जिल्ह्यांमध्ये बाल अतिदक्षता विभाग (PICU) सुरू करण्यात आले आहेत.
विदर्भ सर्वाधिक संवेदनशील – आरोग्य विभागाच्या माहितीनुसार विदर्भ हा या आजारासाठी सर्वाधिक संवेदनशील भाग आहे. ग्रामीण व कृषी क्षेत्रात डासांची वाढ आणि डुक्कर व पक्ष्यांच्या संपर्कामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
नियंत्रणासाठी उपाययोजना – राज्यात खालील उपाययोजना राबविल्या जात आहेत:
- नियमित लसीकरण व विशेष मोहिमा
- रक्त नमुना तपासणी
- डास नियंत्रणासाठी धूरफवारणी
- क्यूलेक्स डासांचे सर्वेक्षण
- गप्पी मासे सोडणे
- स्वच्छता व जनजागृती अभियान
नागरिकांना आवाहन – आरोग्य विभागाने नागरिकांना लसीकरण पूर्ण करण्याचे, डासांपासून संरक्षण करण्याचे आणि ताप किंवा मेंदूशी संबंधित लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.
