डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सत्कार सोहळा उत्साहात

लोहा| डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिज्ञासा अभ्यासिकेत कृतज्ञता गौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तहसीलदार विठ्ठल परळीकर होते.

यावेळी बोलताना तहसीलदार परळीकर म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांमुळेच समाजात समता निर्माण झाली आणि शिक्षणाची क्रांती घडून प्रगतीची दारे सर्वांसाठी खुली झाली. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करणे आवश्यक आहे. जिज्ञासा अभ्यासिका ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत असून, गेल्या बारा वर्षांत अनेक विद्यार्थी नोकरीला लागले आहेत, ही निश्चितच प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास नगराध्यक्ष शरद पाटील पवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, उपनगराध्यक्ष करीम शेख, प्रा. डॉ. डी. एम. पवार, माजी नगरसेविका कमलबाई धुतमल, मारुती पाटील बोरगावकर, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, भास्कर पवार, पंकज परिहार, गणेश बगाडे, सतीश निखाते, तुकाराम दाढेल, शिवाजी आंबेकर, दत्ता शेटे, डीएसबीचे सदाशिव जामकर, पत्रकार गोविंद कदम, एकनाथ तिडके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नगराध्यक्ष शरद पाटील यांनी शहरातील विकासकामांची माहिती देताना लवकरच अत्याधुनिक वाचनालय उभारण्यात येणार असून त्याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असे सांगितले. प्रा. डॉ. डी. एम. पवार यांनीही आपले विचार मांडले. यावेळी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलांना घडविणाऱ्या रेखाबाई विजय महाबळे, पाणीपुरवठा कर्मचारी राजू सरोदे, गरिबीतून दोन मुलांना शासकीय सेवेत दाखल करणाऱ्या केवळाबाई महाबळे तसेच सामाजिक एकोपा जपणारे सदाशिव जामकर यांचा तहसीलदार व नगराध्यक्ष यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात सामाजिक समता जोपासणाऱ्या माणिकराव पाटील, विठ्ठलराव पवार, व्यंकटराव मुकदम, माजी सरपंच यशवंतराव चव्हाण, संभाजीराव धुतमल, बाळाजी पाटील यांच्या कार्याचेही स्मरण करण्यात आले. प्रास्ताविक हरिहर धुतमल यांनी केले तर संचलन व आभार प्रदर्शनही त्यांनीच केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!