देगलूर रुग्णालयासाठी २२.९७ कोटींचा निधी मंजूर; ‘श्रेय’च्या राजकारणाने वातावरण तापले

नांदेड, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उन्नतीसाठी २२.९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने सीमावर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र या निर्णयानंतर ‘श्रेय’ कोणाचे, यावरून राजकीय वर्तुळात चांगलाच वाद रंगला असून वातावरण तापले आहे.

या निधीतून देगलूर उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात येणार असून, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे देगलूरसह परिसरातील ग्रामीण व सीमावर्ती भागातील रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.

दरम्यान, या प्रकल्पासाठी राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा काही माध्यमांतून करण्यात आला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र या दाव्याला देगलूरचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी ठाम विरोध दर्शविला आहे. “हे काम माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच मंजूर झाले आहे. इतर कोणाचा सहभाग असल्याचे मला वाटत नाही. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांशी थेट संवाद साधावा,” असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार अंतापुरकर यांच्या कार्यालयातून उपलब्ध कागदपत्रांमध्येही रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी त्यांच्या प्रयत्नांचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘खरा पाठपुरावा नेमका कुणाचा?’ हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे.

खासदारांच्या पाठपुराव्याबाबत नेमकी माहिती अद्याप स्पष्ट न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दावे आणि कागदपत्रे यामध्ये विरोधाभास दिसत असल्याने चर्चांना अधिकच उधाण आले आहे.

या सर्व घडामोडींमुळे भारतीय जनता पक्षात अंतर्गत मतभेद उघडकीस येत असल्याची चर्चा रंगत आहे. शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपमध्येच श्रेयासाठीची चढाओढ दिसून येत असल्याने पक्षातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Oplus_16908288

दरम्यान, सीमावर्ती भागातील आरोग्य सुविधांचा प्रश्न हा दीर्घकाळ प्रलंबित होता. यासाठी यापूर्वी अनेकदा आंदोलने, बैठका आणि पाठपुरावे करण्यात आले होते. अशा पार्श्वभूमीवर आता निधी मंजूर झाला असला, तरी श्रेयवादामुळे मूळ मुद्दा दुय्यम ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

एकीकडे आधुनिक १०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा होत असताना, दुसरीकडे त्याच्या श्रेयासाठी सुरू असलेली राजकीय स्पर्धाच सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “रुग्णालय लवकर आणि दर्जेदार उभे राहणे महत्त्वाचे,” अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!