धावत्या कारने घेतला पेट कार जळून खाक !

नांदेड – बीदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर दिग्रस खुर्द जवळील घटना 
कंधार (सचिन मोरे) कंधार तालुक्यातील दिग्रस खुर्द गावाजवळ एका हुंडाई कंपनीच्या चालत्या कार ला अचानक आग लागल्याने संपूर्ण कार जळून खाक झाल्याची घटना १३ एप्रिल रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली.या घडलेल्या भयंकर घटनेतून कार चालक सुदैवाने बालबाल बचावला आहे.

या घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की, कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील गजानन भोसले वय २८ वर्ष हे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पुणे येथे स्थायिक झाले आहेत. ते १३ एप्रिल रोजी काही घरगुती कामानिमित्त पुणे येथून लातूर मार्गे आपली हुंडाई सेंट कार क्रमांक एमएच १२ आरएन ७१२३ ने अंबुलग्याकडे जात असताना नांदेड – बिदर राष्ट्रीय महामार्ग ५० वरील दिग्रस खुर्द गावाजवळील गांधीनगर पाठीजवळ आले.

अचानक कारच्या समोर हरीण आल्यामुळे भोसले यांनी गाडीचे ब्रेक दाबले असता कारने अचानक पेट घेतला. प्रसंग अवधान राखत कारचालक कारच्या बाहेर आले. काही मिनिटाच्या आतच कार पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या अपघातात कार मालकाचे अंदाजे सात ते आठ लक्ष रुपयाचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी व्यक्तीने सांगितले.

या कारमध्ये महत्त्वाचे कागदपत्र व रोख रक्कम २५००० असल्याचे वाहन चालक गजानन भोसले यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. हा अपघात घडल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या कार मधील एकमेव गजानन भोसले हे होते. ते तात्काळ कारच्या बाहेर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. आग कशामुळे लागली याचे तांत्रिक कारण काय होते याची माहिती मिळू शकली नाही. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून यामुळे आग लागण्याचे प्रमाण हे वाढत असल्याचे दिसून येत आहे.

चालक बालबाल बचावला !
कारचालकाने अचानक ब्रेक दाबल्यानंतर कारमधून अचानक धूर निघायला सुरू झाला. काही क्षणातच इलेक्ट्रिकल सिस्टीम बंद पडली. यामुळे दरवाजा निघेल की नाही अशी शक्यता होती मात्र ड्रायव्हरने दरवाज्याला जोराचा धक्का देत दरवाजा उघडला आणि बाहेर उडी मारली. त्यामुळे सदरील ड्रायव्हरचा जीव वाचला. कारचालकाला ज्या गावाला जायचे होते हे गाव अपघात ठिकाणापासून केवळ दहा किलोमीटर दूर होते.

एपीआय मगर घटनास्थळी
ही कार महामार्गावर जळत असताना कंधार पोलीस स्टेशनचे एपीआय मगर हे काही कामानिमित्त कंधार कडून दिग्रस मार्गे जळकोटला जात होते. त्यांनी तात्काळ लोहा येथील अग्निशामक दलास घटनेविषयी माहिती सांगत घटनास्थळी येण्याची विनंती केली असता लोहा येथून गाडी येईपर्यंत कार पूर्णतः जळून खाक झाली होती.

कंधार अग्निशामक दलाने पाठ फिरवली
या भीषण घटनेविषयी कंधार नगर परिषदेच्या अग्निशामक दलास कार चालक भोसले यांनी संपर्क केला असता आमच्या गाडीमध्ये पाणी नाही असे म्हणत अग्निशामक दलाने असमर्थता दाखविल्याचे कारचालकाने सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये कंधारच्या अग्निशामक दलाविषयी नाराजीचा सूर ऐकण्यास मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!