पैनगंगा काठावर केबल चोरट्यांचा हैदोस; २५–३० शेतकरी अंधारात, सुमारे ३ लाखांचे नुकसान

हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातील धानोरा ज. शिवारात पैनगंगा नदी परिसरात अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना लक्ष्य करत मोठा डल्ला मारला आहे. दिनांक ११ एप्रिलच्या रात्री २५ ते ३० शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या कनेक्शन केबलची चोरी करण्यात आली असून, या प्रकारात सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील ही सलग चौथी घटना असून, अद्याप एकाही प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही.

नदी व शेतीमधील अंतर मोठे असल्याने शेतकऱ्यांनी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करत मोटारींना ऑटोमॅटिक स्टार्टर बसवले आहेत. शेतकरी दररोज मोटारीकडे जात नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, श्रीक्षेत्र बोरगडी येथील माजी सरपंच देवन्ना शेन्नेवाड यांचे पुत्र ज्ञानेश्वर शेन्नेवाड यांना रात्री सुमारे ११.१५ वाजता शेतात पाणी आले नसल्याने संशय आला. ते मोटारीकडे गेले असता केबल चोरी झाल्याचे उघड झाले. त्यांनी तत्काळ परिसरातील शेतकऱ्यांना संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता २५ ते ३० शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्याचे समोर आले.

घटनास्थळी केबलचा ढिग करून जाळल्याचेही आढळून आले. चोरट्यांनी केबल जाळून आतला तांब्याचा तार काढण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांनी वेळीच धाव घेतल्यामुळे त्यांना पूर्ण यश मिळाले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी कारला, सवना ज. आणि गणेशवाडी परिसरातही अशाच प्रकारच्या केबल चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकरणाचा छडा लागलेला नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

चोरींची मालिका सुरूच
तालुक्यातील कारला, सवना ज. आणि गणेशवाडी भागात यापूर्वीही अनेक शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल चोरीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी चोरट्यांनी केबल जाळून तांब्याचा तार काढण्याचा प्रयत्न केला होता. तरीही पोलिसांना यश न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!