
हिमायतनगर (प्रतिनिधी) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त हिमायतनगर शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद शाळा, विविध संस्था, नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यालये तसेच बौद्ध विहारांमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.


हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष शेख रफिकभाई व नगरसेवकांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी नारवटकर, पांचाळ, स्वप्निल भद्रे, भौरे, भिसे आदींनी अभिवादन केले. तसेच तहसील कार्यालयासह शहरातील विविध शासकीय कार्यालयांतही जयंती साजरी करण्यात आली.



दरम्यान, हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील तक्षशिला बौद्ध विहारातही जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भिम जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.



या कार्यक्रमाला सरपंच गजानन कदम, तंटामुक्त समिती अध्यक्ष डॉ. गफार कार्लेकर, पोलीस पाटील साईनाथ कोथळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


