
प्रज्ञा, शील आणि करुणा या मूल्यांचे आचरण जीवनात करावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


नांदेड| नांदेड येथील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देत बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. “प्रज्ञा, शील आणि करुणा या मूल्यांचे आचरण प्रत्यक्ष जीवनात करणे हीच खरी त्यांना आदरांजली आहे,” असे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.


सामाजिक समता सप्ताहाच्या औचित्याने नागरी हक्क संरक्षणांतर्गत अत्याचारग्रस्त दिवंगत व्यक्तींच्या कुटुंबातील १३ पात्र वारसांना शासकीय नोकरीचे आदेश देण्यात आले. तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत ४ लाभार्थ्यांना जमिनीचे आदेश वाटप करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतिक सभागृहात मुख्य कार्यक्रम व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून उपायुक्त छाया कुलाल उपस्थित होत्या. सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे, सेवानिवृत्त वरिष्ठ निरीक्षक अशोक गोडबोले, समाजभूषण पुरस्कारप्राप्त भगवान ढगे, दलित मित्र पुरस्कारप्राप्त माधव आंबटवाड, सहाय्यक लेखाधिकारी संतोष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख व्याख्याते म्हणून यशवंत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अजय गव्हाणे व सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संदीप गोणारकर यांनी मार्गदर्शन केले. प्रा. गव्हाणे यांनी बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला, तर प्राचार्य गोणारकर यांनी महाड चवदार तळे सत्याग्रह संदर्भ देत मानवी हक्कांचे महत्त्व स्पष्ट केले.

सामाजिक समता सप्ताह (८ ते १४ एप्रिल २०२६) अंतर्गत संविधान प्रस्ताविकेचे नियमित वाचन, शासकीय वसतिगृह व निवासी शाळांमध्ये विविध स्पर्धा, महिला जागर मेळावा, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान तसेच ‘घरघर संविधान’ यांसारखे उपक्रम राबविण्यात आले. समतादूतांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात पथनाट्याद्वारे योजनांची जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पांपटवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजानन नरवाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.दरम्यान, सकाळी सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे व कर्मचारीवर्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
