नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला; उष्माघातापासून वाचण्यासाठी आरोग्य विभागाचे आवाहन

नांदेड| नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ होत असून, उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद नांदेडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, “नांदेडमध्ये उन्हाची तीव्रता वाढत असून विशेषतः दुपारच्या वेळी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघात हा गंभीर ठरू शकतो; मात्र योग्य काळजी घेतल्यास त्यापासून बचाव करणे शक्य आहे. आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे.”

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

  • पुरेसे पाणी प्या : तहान लागली नसली तरी नियमित पाणी प्या, बाहेर जाताना पाण्याची बाटली जवळ ठेवा.
  • पेयांचा वापर : लिंबू सरबत, ताक, लस्सी, ORS यांसारख्या पेयांचे सेवन करा.
  • योग्य पोशाख : हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे परिधान करा. डोक्यावर टोपी/रुमाल/छत्री वापरा.
  • दुपारची वेळ टाळा : दुपारी १२ ते ३:३० दरम्यान उन्हात जाणे टाळावे.
  • आहार : पचायला हलका व पाण्याचे प्रमाण जास्त असलेले फळे जसे कलिंगड, संत्री, द्राक्षे खावीत.

काय टाळावे?

  • दुपारच्या कडक उन्हात कष्टाची कामे करणे टाळा.
  • चहा, कॉफी व मद्यपान टाळावे (शरीरातील पाणी कमी होते).
  • बंद वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राणी ठेवू नयेत.

उष्माघाताची लक्षणे व उपाय

उच्च ताप, चक्कर येणे, मळमळ, डोकेदुखी किंवा शुद्ध हरपल्यासारखे वाटल्यास संबंधित व्यक्तीला त्वरित सावलीत आणावे, ओल्या कापडाने शरीर थंड करावे आणि जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे. आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरून न जाता सजग राहून प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!