
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरासह तालुकाभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी पंचशील ध्वजारोहण करून तथागत गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यांची भव्य शोभायात्रा काढत अभिवादन करण्यात आले.


शहरातील विविध चौकांमध्ये मान्यवरांनी भीमसैनिकांना शुभेच्छा देत डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. महिला-पुरुष, युवक-युवती तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.



जयंतीनिमित्त शहर व ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हिमायतनगर शहरात सकाळी ११ वाजता पंचशील ध्वजारोहणानंतर नालंदा बौद्ध विहारात सामुदायिक पंचशील व त्रिशरण ग्रहण करण्यात आले. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गांवरून तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेबांच्या मूर्तींची शोभायात्रा काढण्यात आली.



या शोभायात्रेदरम्यान शालेय विद्यार्थी व युवकांनी भीमगीतांच्या तालावर उत्साहाने ठेका धरला. बौद्ध उपासक-उपासिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत लक्ष वेधले. शहरातील विविध चौकात शोभायात्रेचे स्वागत करत सहभागी अनुयायांना थंड सरबत व पाण्याचे वाटप करण्यात आले.



शहरातील चौपाटी, पोलीस ठाणे, बाजार लाईन, गणेश चौक, बजरंग चौक, सराफा लाईन, महात्मा फुले चौक, श्री परमेश्वर मंदिर, लकडोबा चौक मार्गे निघालेली ही मिरवणूक आंबेडकर चौकातून लुंबिनी बौद्ध विहार येथे पोहोचून समारोप करण्यात आला. एकूणच, ‘जय भीम’ च्या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात हिमायतनगरात भीम जयंती उत्साह, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत साजरी करण्यात आली.
