ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्रात क्रांतिकारक निर्णय घ्या – डॉ. हंसराज वैद्य यांची मागणी

नांदेड| राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत ऐतिहासिक व क्रांतिकारक निर्णय घ्यावेत, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक फेडरेशन (फेस्कॉम) चे उत्तर मराठवाडा विभाग अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी केली आहे. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ही मागणी व्यक्त केली.

डॉ. वैद्य म्हणाले की, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, गोवा, दिल्ली व झारखंड या राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ठोस व कल्याणकारी निर्णय घेतले जात आहेत. मग सामाजिक समतेचा पुरस्कार करणाऱ्या महाराष्ट्रात असे निर्णय का घेतले जात नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र हे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित पुरोगामी राज्य आहे. मात्र प्रत्यक्षात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

“ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या तरुणपणी समाज व राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान दिले. आज त्यांनाच सन्मानाने जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे,” असे डॉ. वैद्य म्हणाले. इतर राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना, आर्थिक सहाय्य, आरोग्य सुविधा व सन्मानाने जीवन जगण्याचे अधिकार सुनिश्चित केले जात आहेत. मात्र महाराष्ट्रात या बाबतीत अपेक्षित संवेदनशीलता दिसून येत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सन्मान, सुरक्षितता व आत्मनिर्भरतेने जीवन जगता यावे, यासाठी शासनाने ठोस धोरण आखावे. विशेषतः निराधार, गरीब, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, विधवा व दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठी मानधन व इतर सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. या मागण्यांकडे राज्य सरकारने सकारात्मक दृष्टीकोनातून पाहावे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी ठोस निर्णय घ्यावेत, असे आवाहनही डॉ. वैद्य यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!