आ. चिखलीकरांच्या हस्ते ५०फूट उंचीच्या पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण

जिल्ह‌यातील सर्वात मोठे बुध्द विहार लोहयात साकारले जातेय

लोहा | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लोहा शहरात उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते ५० फूट उंचीच्या पंचशील ध्वजाचे भव्य ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार चिखलीकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आज देश चालत असल्याचे सांगितले. त्यांच्या जयंतीनिमित्त मतदारसंघात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले. लोहा येथे उभारण्यात येत असलेले बुद्ध विहार जिल्ह्यातील सर्वात मोठे ठरेल, असा विश्वास व्यक्त करत या परिसराला धम्मविचारांचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

जुना शहर परिसरात बुद्ध विहारासमोर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण आमदार चिखलीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रविण पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पाटील, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, मंगलताई धुतमल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात ५० फूट उंच पंचशील ध्वज उभारण्यात आला असून तो जिल्ह्यातील सर्वात उंच ध्वज असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा ध्वज छत्रपती धुतमल व अनिल धुतमल यांच्या पुढाकारातून उभारण्यात आला आहे.

याचबरोबर भीम जयंतीनिमित्त शहरात संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप करण्यात आले. सकाळी त्रिरत्न बुद्ध विहार येथे ध्वजारोहण करण्यात आले, तर माजी नगरसेवक उत्तम महाबळे यांच्या वतीने खिचडी वाटपाचा कार्यक्रमही पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिहर धुतमल यांनी केले, तर पूजापाठ रत्नाकर महाबळे, धोंडिबा नाभूरे, बापुसाहेब कापुरे व सिद्धार्थ महाबळे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!