
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या शैक्षणिक (संलग्नीकरण) विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६–२०२७ साठी एक महत्त्वाची सुधारित सूचना जाहीर करण्यात आली आहे.


या सूचनेनुसार, नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली जिल्ह्यातील काही संलग्न महाविद्यालयांनी दि. २३ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित यादीप्रमाणे संलग्नीकरण नूतनीकरणाचा प्रस्ताव व आवश्यक शुल्क विद्यापीठाकडे सादर केलेले नाही. त्यामुळे अशा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.


विद्यापीठाने पुढे इशारा दिला आहे की, संबंधित महाविद्यालयांनी सूचनेचे पालन न केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. यात पात्रता मान्यता, परीक्षा अर्ज स्वीकृती, प्रवेशपत्र वितरण तसेच निकाल जाहीर होणे यांसारख्या प्रक्रिया थांबू शकतात. अशा परिस्थितीत याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थी, पालक व महाविद्यालय प्रशासनावर राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


ही सुधारित सूचना विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर “Circular-Affiliation” या विभागात उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी संबंधित महाविद्यालयाचे संलग्नीकरण वैध आहे की नाही, याची खात्री करूनच प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.


