
डॉ. पंडित नांदेडकर यांना राष्ट्रीय स्तरावर तृतीय पारितोषिक


नांदेड (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंशाच्या संवर्धन व संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत असून, या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तज्ज्ञांचा सन्मान करण्यात येत आहे.


महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालय, परभणी येथील पशु अनुवंश व पैदास विभागाचे प्राध्यापक डॉ. पंडित नांदेडकर यांना ‘मथुरा लभान गोवंश – महाराष्ट्राचा अभिमान’ या विषयावरील मौखिक सादरीकरणासाठी राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. हा सन्मान ८ एप्रिल २०२६ रोजी करनाल येथील ICAR-राष्ट्रीय प्राणी आनुवंशिक संसाधन ब्युरो येथे आयोजित परिषद व पाळीव पशु संवर्धन सोसायटीच्या 23 व्या वार्षिक अधिवेशनात प्रदान करण्यात आला.


या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी डॉ. नांदेडकर यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, डॉ. प्रवीणकुमार घुले, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. मकरंद खरवडकर, डॉ. श्याम पवळे तसेच मथुरा-लभान पशुपालक उपस्थित होते. यावेळी डॉ. सखाराम खुणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ‘मथुरा-लभान’ गोवंशाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. विशेषतः किनवट तालुक्यातील कार्याचा आढावा सादर करण्यात आला.



दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागसवाडी (ता. किनवट) येथील पशुपालक बालसिंग नानगू खचकड यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच ‘मथुरा-लभान’ गोवंशाच्या संवर्धन व संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या.
