पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापनावर १५ एप्रिलला डिजिटल शेतीशाळा-३

पुणे/नांदेड| शाश्वत शेतीकडे वाटचाल करताना कीड व्यवस्थापनात पर्यावरणपूरक उपायांचा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ अंतर्गत सुरू असलेल्या विशेष डिजिटल शेतीशाळा मालिकेतील तिसरे सत्र १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

कृषी विभाग, पानी फाउंडेशन आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शेतीशाळेत ‘पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पक्षी थांबे, चिकट सापळे, कामगंध सापळे तसेच मित्र कीटकांचे संवर्धन यांसारख्या उपाययोजनांद्वारे कीड नियंत्रण कसे साधता येईल, याची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून उत्पादन खर्चात बचत आणि मृदास्वास्थ्य जपण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

दरम्यान, या मालिकेतील पहिल्या दोन डिजिटल शेतीशाळांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या सत्रात पेरणीपूर्व तंत्रज्ञान, बेड तयार करणे, शून्य मशागत, आंतरपीक पद्धती, बीज उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रिया यावर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रात ८५ हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.

तसेच ८ एप्रिल रोजीच्या दुसऱ्या सत्रात जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादनावर भर देत बीजामृत, जीवामृत, घन जीवामृत, लिंबोळी अर्क व दशपर्णी अर्क तयार करण्याच्या पद्धतींचे मार्गदर्शन करण्यात आले. या सत्राला १,००,१०८ हून अधिक शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला, ही या उपक्रमाची मोठी यशोगाथा ठरली आहे. या मालिकेतील चौथे सत्र २२ एप्रिल रोजी भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्रावर होणार आहे.

या सर्व सत्रांमध्ये कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा सहभाग, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मिळणारी तत्काळ उत्तरे तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव यामुळे ही शेतीशाळा संवादात्मक व उपयुक्त ठरत आहे. सर्व सत्रांचे थेट प्रक्षेपण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या यूट्यूब चॅनेलवर करण्यात येणार असून शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी क्षेत्रातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!