
• समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी
• जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न



नांदेड| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून समाजातील नागरिकांनी लेखणी हातात घेतली असून शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची मोठी प्रगती झाली आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विचार समाजात पोहोचण्यासाठी सातत्याने वाचन करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महापौर कविता मुळे, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्यासह विविध सदस्य, धर्मगुरू, नागरिक व पत्रकार उपस्थित होते.


नांदेड जिल्हा हा चळवळीचा जिल्हा असून विविध सामाजिक उपक्रमात नागरिकांचा सक्रिय सहभाग असतो. जयंती उत्सवात मोठ्या आवाजातील डीजेऐवजी लेझीमसारख्या पारंपरिक उपक्रमांना प्राधान्य देऊन आनंदी वातावरणात उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.


जिल्ह्यात सीसीटीव्ही प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू असून शांतता समितीत महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच कायदा-सुव्यवस्था आढावा बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महापौर कविता मुळे यांनी जयंती उत्सव समता, बंधुत्व व एकोप्याने साजरा करण्याचे आवाहन करत युवकांना जबाबदाऱ्या देण्याची गरज अधोरेखित केली. उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यास मनपाचे सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी मिरवणूक मार्गावर योग्य नियोजन करण्यात आले असून कोणताही अडथळा येणार नाही, याची दक्षता घेतली जाईल असे स्पष्ट केले. नागरिकांनी अडचण आल्यास 112 या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. यंदा जयंतीनिमित्त युवक-विद्यार्थ्यांसाठी 18 तास अभ्यास उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी प्रशासनाकडून आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले. बैठकीत विविध सदस्यांनी मिरवणूक, सुरक्षा, पाणी, स्वच्छता व सीसीटीव्ही व्यवस्था याबाबत सूचना मांडल्या. बैठकीचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी केले. तर सदस्य सचिव तथा अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी आभार मानत नांदेड जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
