सामाजिक समता सप्ताहात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य व जनजागृती मेळावा उत्साहात संपन्न

नांदेड| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाअंतर्गत आज (दि. 13 एप्रिल) संध्या छाया संचलित रुस्तुमजी मेवालाल वृद्धाश्रम, मालेगाव रोड, नांदेड येथे ज्येष्ठ नागरिक जनजागृती मेळावा व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी.डी. जोशी पाटोदेकर होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून वृद्धाश्रमाच्या सचिव सुरेखा पाटणे उपस्थित होत्या. यावेळी समाज कल्याण विभागाचे विठ्ठल बोराटे, कपिल जेटलावार, गजानन पंपटवार, विजय माळवतकर, प्रमोद गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा संविधानाच्या प्रस्तावनेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर आयोजित आरोग्य शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुप्रिया गोडघासे, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनिकेत जोशी तसेच कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. अश्विन लव्हेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक गजानन पांपटवार यांनी करताना ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. सचिव सुरेखा पाटणे यांनी वृद्धाश्रमातील सोयी-सुविधा व दिनचर्येबाबत माहिती दिली. विठ्ठल बोराटे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोप डॉ. पी.डी. जोशी पाटोदेकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप फटाले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सुप्रिया गोडघासे यांनी केले. कार्यक्रमानंतर त्वरित वृद्धांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दरम्यान, सामाजिक समता सप्ताहानिमित्त शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. अण्णाभाऊ साठे, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम सहाय्यक आयुक्त शिवानंद मीनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!