
कंधार (सचिन मोरे) कंधार येथे शहीद वीर जवान कामेश विठ्ठल कदम यांचा हुतात्मा स्मारक कंधार येथे त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या हिमतीने उभे केले असून हे स्मारक भावी पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असून, येणाऱ्या पिढीने कामेश कदम यांच्या विचाराचे अनुकरण करत देश सेवा करावी असे आवाहन लोहा कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी केले.


कंधार शहराजवळील मुखेड- कंधार मुख्य रस्त्यावर शहीद कामेश विठ्ठलराव कदम यांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर,आंबेडकरवादी मिशनचे संस्थापक डॉ.दीपक कदम, माजी नगरसेविका डॉ. करुणाताई जमदाडे, शहीद कामेश कदम चे वडील विठ्ठलराव कदम, मातोश्री सुनंदाताई कदम, नगर परिषदेचे उपाध्यक्ष मन्नान चौधरी,माजी नगराध्यक्ष मोहम्मद जफरोद्दीन, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव,कंधार खरेदी विक्री संघाचे चेअरमन किशनराव डफडे, मधुकर पा डांगे, नगरसेवक पिंटू कदम, नगरसेवक कैलास कांबळे, समीर चाऊस, मझर शेठ, स्वाती कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.


याप्रसंगी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते शहीद वीर जवान कामेश कदम यांच्या हुतात्मा स्मारकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर कदम कुटुंबीयांच्या वतीने आमदार चिखलीकर यांचा शाल श्रीफळ व हार घालून सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना आमदार चिखलीकर म्हणाले की, ” कंधार शहर हे ऐतिहासिक शहर असून, शूर वीरांची भूमी म्हणून कंधारची ओळख सबंध महाराष्ट्राला आहे.


या भूमीतून निजामा विरुद्ध चळवळ फार मोठ्या प्रमाणात लढल्या गेली. त्या लढ्यात शेकडो बहाद्दर हुतात्मे झाले. त्या हुतात्म्यांच्या बलिदानामुळेच आज आपण सर्वजण सन्मानाने जीवन जगत आहोत.” त्यांच्या विचाराचा वारसा वीर जवान कामेश कदम यांनी अंगीकारत देश सेवेसाठी मोठे बलिदान दिले. माझ्या भूमीतील वीर जवान शहीद झाल्याचे दुःख माझ्यासहित आपल्या सर्वांना असून त्यांच्या स्मारकातून येणाऱ्या पिढीने आदर्श घ्यावा असे आवाहन आमदार चिखलीकर यांनी यावेळी केले.



या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दी. गा.पाटील यांनी केले तर वीर जवान यांना श्रद्धांजली वाहून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास कदम परिवारांचे नातेवाईक, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात स्त्री पुरुषांची उपस्थिती लक्षणीय होती.
